Articles Editor Choice Maharashtra संग्रामपूर

गोविंदा गोविंदा नामघोषात रंगली सोनाळा नगरी! सोनाजी महाराज यात्रा “रथमहोत्सव”उत्साहात साजरा.

Spread the love

संग्रामपूर|समर्थ भारत मराठी :

पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सोनाजी महाराजांचा रथयात्रा महोत्सव जल्लोषात ‘गोविंदा’ ‘गोविंदा’ नामघोषात झेंडूची फुले व रेवडी, दहीकाल्याचा प्रसाद रथावरून उधळीत २९ नोव्हेंबर रोजी संतनगरी सोनाळा येथे उत्साहात पार पडला. उत्सवासाठी पंचक्रोशीतील बुलढाणा,अकोला,अमरावती व मध्यप्रदेश राज्यातील हजारो भाविकभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

‘गोविंदा’ ‘गोविंदा’ च्या गजरामध्ये श्री संत सोनाजी महाराजांच्या रथ उत्सवाला २८ नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजता पासून सुरुवात झाली तर सांगता दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ह. भ. प. मधुकर महाराज साबळे यांच्या काल्याचे कीर्तन व दहीहंडीने करण्यात आली.
संपूर्ण गावांमधून रथ उत्सव काढण्यात आला.२८ नोव्हेंबर च्या रात्री बाराच्या सुमारास संत सोनाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण सोनाजी नगरी दुमदुमली होती. भाविकांनी नवसाच्या नारळाचे तोरण व झेंडूची फुले रथावर बांधली ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. तीन मजली रथाला नारळ व झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजविल्या गेले होते .
श्री संत सोनाजी महाराज नगरीमध्ये प्रत्येक घराच्या समोर अंगना मध्ये रांगोळ्या काढून भक्तिभावाने रथाचे पूजन करण्यात आले तसेच या रथ उत्सवा करिता परिसरातील अनेक गावागावातून आलेल्या भजनी दिंड्या, टाळ मृदंगासह सहभागी झाल्या होत्या.

२८ नोव्हेंबर च्या रात्री प्रकाश बाबा मंदिर परिसरात रथ ठेवण्यात येऊन २९ नोव्हेंबर च्या सकाळी रथ उत्सवाला सुरवात करण्यात आली. गावातून मार्गक्रमण केल्यानंतर श्री संत सोनाजी महाराज रथाचे दुपारी १२ वाजता मंदिर परिसरात आगमन होऊन महाआरती करण्यात आली व नंतर सोनाजी महाराज मंगल कार्यालय परिसरात उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले .
संत सोनाजी महाराज संस्थान विश्वस्तांनी गेल्या महिन्याभरापासून केलेल्या परिश्रमाने व गावातील नागरिकांनी भाविकांच्या सहकार्याने यात्रा महोत्सव सोहळा यशस्वी पार पाडला .
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात साजऱ्या होणाऱ्या यात्रा महोत्सवात मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची साधने एकत्र येतात.यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी १२१क्विंटल ज्वारीची भाकरी,३५क्विंटल उडदाची डाळीचे वरण,अंबाडीची भाजी असे महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विदर्भ सहसचिव व जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील,डॉ. अपर्णा संजय कुटे , खासदार प्रतापराव जाधव,डॉ.स्वाती वाकेकर यांच्यासह राजकीय गणामान्य व्यक्तिंनी संतनगरीत उपस्थित होऊन ” श्री” चे मनोभावे दर्शन घेतले.
यात्रेमध्ये गावातील राणा ग्रुप ,जाणताराजा, सोनाजी महाराज सेवाधारी मंडळ, बोरखेड ,सगोडा,दानापुर,टूनकी इतर ठिकाणच्या सेवकांनी यांनी आपले विशेष सहकार्य दिले .
सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकात पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!