बुलढाणा दि.१५ (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
मनोरुग्णांचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे त्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मान देणे असते,त्यांचा वाढदिवस साजरा केला तर त्यांना समाजाचा भाग असल्याची जाणीव होते. या दृष्टीने बुलढाणा तालुक्यातील वरवंट येथील दिव्य सेवा प्रकल्पात बेवारस, निराधार मनोयात्री माता-बांधवांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त २७ जानेवारीला सामुहिक वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्य सेवा प्रकल्प मनोरुग्ण, निराधार माता- बांधवांचे हक्काचे घर आहे. अनेक वर्षापासून संस्थापक अशोक काकडे मनोरुग्णांच्या सेवेत आहेत. मनोरुग्णांसाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम प्रकल्पात राबविण्यात येतात. याच अनुषंगाने सामूहिक वाढदिवस आयोजित करण्यात आला आहे. रस्त्यावर बेवारसपणे आयुष्य जगणाऱ्या या जीवांना स्वत: चे नाव सुध्दा माहीत नसते, तर जन्मदिन माहीत असण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु, तरीही आपला जन्मदिन कुणी तरी साजरा करावा, आपल्याला ही केक, पेढा भरवावा, आपले ही कुणी औक्षण करावे, असे त्यांना ही वाटतेच म्हणून भारताच्या गणतंत्र दिनाचे औचित्य साधून त्यांचा जन्मदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
नविन कपडे, गोड धोड जेवण सर्वांना कप केक, मोठा केक, स्टेज वरिल भरगच्च कार्यक्रम, डीजे, नाच गाणे असा आनंददायी भरगच्च कार्यक्रम राहणार आहे. या अनोख्या कार्यक्रमासाठी अंदाजे १लक्ष रुपये पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. दानशूरांनी इच्छेनुसार व क्षमतेनुसार यात सहभागी व्हावे, असे आवाहन दिव्य सेवा प्रकल्पाने केले आहे.













Add Comment