Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

वीटभट्टीवरील आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ‘रुबल जिज्ञासा केंद्र’ सुरू.

Spread the love

जळगांव जामोद,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

दरवर्षी रोजगाराच्या शोधात आदिवासी कुटुंबे वीटभट्ट्यांवर रोजगारासाठी स्थलांतरित होतात. अनेकदा पालकांसोबत त्यांची लहान मुलेही वीटभट्टीवर जात असल्याने या मुलांचे शिक्षण खंडित होते आणि ते शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर, वीटभट्टीवरील मुलांचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये, या उद्देशाने रुबल फाऊंडेशनने पुढाकार घेत तालुक्यातील माणेगाव येथील वीटभट्टी परिसरात ‘रुबल जिज्ञासा शिक्षण केंद्र’ सुरू केले आहे.

वीटभट्टीवरील मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या ‘रुबल जिज्ञासा केंद्राचे’ उद्घाटन नुकतेच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. प्रशांत बनसोडे (गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे) होते. प्रमुख पाहुणे म्हणून उमापूरचे उपसरपंच ओंकार गौतम उपस्थित होते. यावेळी वीटभट्टी मालक महादेव मोरे, वासुदेव वसतकार, लता मावसकर, रतन बिबोकार, मंगेश सावरकर आणि विनोद वानखडे यांची उपस्थिती होती.

‘रुबल जिज्ञासा केंद्र’ सुरू करण्यामागील भूमिका आणि त्यामागची सामाजिक गरज रुबल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी आपल्या मनोगतातून सविस्तरपणे मांडली. स्थलांतरामुळे आदिवासी मुलांचे शिक्षण सातत्याने खंडित होत असल्याने ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर पडतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क आहे आणि ते शिक्षण केवळ औपचारिक न राहता अधिकाधिक दर्जेदार, बालककेंद्रित आणि सक्षमीकरण करणारे असले पाहिजे. स्थलांतरित आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधीपासून वंचित ठेवले गेले, तर त्यांच्या पुढील आयुष्यातील संधी मर्यादित होतात. ही दरी भरून काढण्यासाठी रुबल फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी विशेष, सातत्यपूर्ण आणि संवेदनशील प्रयत्न केले जातील, असे मनोगत डॉ. राजपूत यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. प्रशांत बनसोडे यांनी रुबल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत, वंचित व स्थलांतरित आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी अशा शैक्षणिक केंद्रांची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे ओंकार गौतम यांनी वीटभट्टीवरील आपल्या कोरकू बांधवांना आपल्या मुलांना नियमितपणे रुबल जिज्ञासा केंद्रात पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी महादेव मोरे यांनी व्यसनाधीनतेच्या समस्येकडे लक्ष वेधत तिचा कुटुंबांवर आणि मुलांच्या भविष्यावर होणारा विपरीत परिणाम अधोरेखित केला. वासुदेव वसतकार यांनी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत ‘शिक्षणाशिवाय पर्याय नाही’ असे ठाम मत मांडले. रतन बिबोकार यांनी उमापूर येथील रुबल जिज्ञासा केंद्राचा यशस्वी अनुभव सांगत, त्याच धर्तीवर वीटभट्टीवरील हे शैक्षणिक केंद्रही प्रभावीपणे आणि यशस्वीपणे चालेल, असा विश्वास व्यक्त केला.

वीटभट्टीवरील रुबल जिज्ञासा केंद्रासाठी भट्टीमालक महादेव मोरे आणि शेतमालक वसतकार यांनी विनामूल्य खोली उपलब्ध करून दिली आहे. सध्या या केंद्रात ३२ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या शिक्षणासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहनही डॉ. राजपूत यांनी यावेळी केले. रुबल फाऊंडेशनच्या रुबल जिज्ञासा केंद्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!