जळगाव जामोद,दि.१८(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या वतीने १८ जानेवारी रोजी स्थानिक महात्मा फुले कन्या शाळा येथे पत्रकार दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील कर्तृत्ववान पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.तसेच तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील, गुलजार खाँ पठाण, कैलास बापू देशमुख, अभिमन्यू भगत, गुलाबराव इंगळे, शमीम देशमुख तसेच माजी सैनिक रमेश वाघमारे यांची उपस्थिती होती.या सोहळ्यात पत्रकारांच्या विविध श्रेणीतील योगदानाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शोध पत्रकारिता पुरस्काराने गुलाबराव इंगळे, राजीव वाढे आणि सागर झनके.उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने दैनिक महासागर चे तालुका प्रतिनिधी अनिल भगत,संजय दांडगे आणि वैभव वडोदे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यासोबतच तालुक्यातील तळागाळातील ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना राजीव वाढे यांनी पत्रकारितेतील आव्हाने आणि सामाजिक जबाबदारी यावर आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर झनके यांनी केले, तर आभार आश्विन राजपुत यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Add Comment