जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

रेती घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे बेपत्ता!

Spread the love

जळगांव जामोद,दि.१४(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील रेती घाटांच्या लिलावानंतर तेथे शासनाचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी केला आहे. रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक असतानाही ते अद्याप लावण्यात आलेले नाहीत, तसेच घाटांची मोजणी देखील झाली नसल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांच्या समवेत उपविभागीय अधिकाऱ्यांना दिनांक १३ फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन रेती घाटांचे लिलाव रद्द करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील सहा रेती घाटांचा लिलाव झाला आहे.नियमानुसार या घाटांवर देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी प्रत्यक्षात पाहणी केली असता कोणत्याही घाटावर कॅमेरे दिसून आले नाहीत. याशिवाय लिलाव झालेल्या क्षेत्राची अधिकृत मोजणी करून दिली आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.​

निवेदनात नमूद केल्यानुसार, रेती माफियांनी शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आतापर्यंत हजारो ब्रास रेतीचे विना रॉयल्टी उत्खनन करून विक्री केली आहे. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला असून, रॉयल्टी बुक तत्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रकरणाची तक्रार यापूर्वीच महसूल मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हे रेती घाट तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी गजानन वाघ यांनी केली आहे.

मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.​निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना गटनेते भास्कर जाधव, पालकमंत्री मकरंद पाटील, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!