जळगाव जामोद दि.१५ (समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ, हैदराबाद यांचे केंद्र स्थापन करून असंख्य विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण देवून उष्कृष्ठ शिक्षण, परीक्षेचे नियोजन करून भारतातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास प्रथम क्रमांकाच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
स्थानिक बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सलीम पटेल, उपाध्यक्ष प्रा. कय्युम पटेल, सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ, हैदराबाद यांचे केंद्र स्थापन केले. या केंद्रामधून असंख्य विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले आहे व घेत आहेत. सदर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने त्यांच्या प्रवेशापासून तर उच्च विद्याविभूषित प्राध्यापक व कर्मचारी यांनी योग्य दर्जाचे शिक्षण दिले व परीक्षेचे आयोजन केले. त्यासाठी मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीने या वर्षी भारतातील शीर्ष १० महाविद्यालयांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी, विद्यापीठाने एक समिती स्थापन केली, ज्यात विविध विद्यापीठांमधील सदस्यांचा समावेश होता. हे मूल्यांकन १० निकषांवर आधारित होते, ज्यामध्ये समन्वयकाचा डेटा आणि कामगिरीसाठी ५० टक्के गुण आणि महाविद्यालयाचा डेटा आणि कामगिरीसाठी ५० टक्के गुण देण्यात आले. यामध्ये बापुमिया सिराजोद्दीन पटेल महाविद्यालयाने भारतात प्रथम क्रमांक पटकावला.
हा पुरस्कार कुलगुरू, पद्मश्री प्रोफेसर डॉ. ऐनुल हसन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे युवा संचालक सिरजोद्दीन पटेल, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शेख फराह,, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. इंगळे, मानु विद्यापीठाचे केंद्रप्रमुख डॉ. नूर मोहम्मद केंद्र, सहाय्यक प्रा. शेख वहिद, डॉ. मुदस्सीर अली तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.













