Education Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जिल्हास्तरीय बिझनेस आयडिया स्पर्धा आणि महिला उद्योजक मेळावा संपन्न.

Spread the love

रूबल फाऊंडेशन व एस.के.के. कॉलेज चा संयुक्त उपक्रम.

जळगांव जामोद,दि.१५(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

रूबल फाऊंडेशन आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कॉलेज, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने “जिल्हास्तरीय बिझनेस–आयडिया स्पर्धा आणि महिला उद्योजक मेळावा” यशस्वीरीत्या पार पडला. महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे, नव्या कल्पनांना व्यासपीठ देणे आणि स्थानिक पातळीवर आत्मनिर्भरतेचा मार्ग बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या मेळाव्यात ८६ महिला आणि ४० महाविद्यालयीन तरुणींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल आणि सचिव अनुप पुराणिक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी, इन्क्युबेशन सेंटरचे प्रमुख डॉ. प्रवीण डाब्रे, रूबल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. कुलदीपसिंह राजपूत तसेच प्रेमसिंह राजपूत आणि प्राचार्य डॉ. करणसिंह राजपूत उपस्थित होते.

स्वागतपर भाषणात डॉ. प्रवीण डाब्रे यांनी महिला व युवतींमध्ये उद्योगशीलता विकसित होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी “महिला उद्योजकतेतूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत उभा राहू शकतो,” असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषणात अनिल जयस्वाल यांनी महिलांनी पुरुषप्रधान मानसिकतेची बंधने झुगारून उद्योगक्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे, संघर्षाला घाबरू नये आणि समाजातील प्रत्येक घटकाने विशेषतः पुरुषांनी महिलांना सक्रिय पाठबळ द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध उद्योजक अनुप पुराणिक यांनी महिलांशी संवाद साधत आपल्या उद्योजकीय प्रवासाचे अनुभव मांडले. उद्योग समृद्धी, उद्योग गुण आणि उद्योग कौशल्य ही उद्योजकतेची मूलभूत सूत्रे स्पष्ट करत त्यांनी संयम, सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.

दुसरे सत्र पूजा म्हात्रे आणि खादी ग्रामोद्योगचे प्रतिनिधी प्रसाद काठोले यांनी संयुक्तपणे घेतले. या सत्रात महिलांसाठी आर्थिक साक्षरता, कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना, आर्थिक शिस्त आणि निधी व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तिसऱ्या सत्रात कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोदचे प्रमुख डॉ. विकास जाधव यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधी, स्थानिक पातळीवरील मूल्यवर्धन, बाजारपेठेच्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मार्गदर्शन केले.

जिल्हास्तरीय बिझनेस–आयडिया स्पर्धेत २६ महिला उद्योजक व ३ तरुणींनी सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून अर्चना जोशी,नीलिमा भोपळे, संतोष कतोरे,ज्ञानेश्वर लाटे आणि पूजा म्हात्रे यांनी काम पाहिले. स्पर्धेत सविता संजय देशमुख यांनी प्रथम, रजनी उमेश वेरूळकर द्वितीय, पुजा सुधीर देशमुख तृतीय, उज्वला कैलास वानखडे चौथा तर अलका रमेश येऊल यांनी पाचवा क्रमांक पटकावला. दीक्षा राहुल वाघोदे, जयश्री सारंग असतकर व शोभा गोमासे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरण अनिल जयस्वाल,अनुप पुराणिक, डॉ. गिरीश मायी व ज्योती राजपूत यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचा समारोप डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कॉलेज आणि संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचे विशेष सहकार्याबद्दल आभार मानले. आयोजनासाठी रूबल फाऊंडेशनच्या अरुणा देशमुख, शरीफा मासरे तसेच कॉलेजच्या स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!