जळगाव जामोद,दि.१(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणेदार नितीन पाटील यांनी कंबर कसली आहे. सोबतच परिसरातील अवैद्य गो तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून यावर निर्बंध लावण्याकरिता नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून अवैध गो तस्करांवर धडाकेबाज कारवाई केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.
जळगाव जामोद पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून किंमत ५ लाख ४० हजार रुपये किमतीचे १६ गोवंश( बैल) जप्त केले आहेत. सर्व गोवंशांना स्थानिक गौरक्षण मध्ये ठेवण्यात आले आहे.
शहरातील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ शाळेच्या मागील पडीत शेतात अज्ञात इसमाने सदर १६ बैलांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयीपणे अरुंद दोराने पाय व मान बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.त्याआधारे २९ नोव्हेंबर रोजी पंचा समक्ष छापा टाकून पोलिसांनी ही निर्दयपणे बांधलेली १६ जनावरे ताब्यात घेतली.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ५७२/२०२५ कलम ११ (फ),(आय) प्राण्यांना क्रूरपणे वागणूक अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांचे मार्गदर्शनात ठाणेदार नितीन पाटील, स.पो.नि नागेश मोहोड, पीएसआय नारायण सरकटे,पीएसआय नागेश खाडे, पीएसआय अमोल पंडित,उमेश शेगोकार, निलेश पुंडे, गजानन मानकर,सचिन राजपूत, संदीप रिंढे, भागवत उंबरहंडे यांनी केली.तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे, पोलीस अधिकारी संजय वेरूळकर हे करीत आहेत.













