शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान.
जळगांव जामोद,दि.८ समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :
जळगांव जामोद तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या जि.प.मराठी प्राथमिक शाळा चारबन चे शिक्षक दीपक उमाळे यांना नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात “आयडॉल शिक्षक” म्हणून शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अमरावती विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचे चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते.तालुक्यातील आदिवासी भागातील चारबन शाळेत शिक्षक दीपक उमाळे यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या भाषेची अडचण सोडविण्यासाठी त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांची पावरी भाषा शिकून पावरी मराठी शब्दकोष तयार केला .जवळपास १० लाखाहून अधिकच शैक्षणिक साहित्य लोकवर्गणीतून गोळा करून संपूर्ण शाळा डिजिटल केली आहे.आजपर्यत जवळपास ८ देशातील परदेशी अभ्यासकांनी चारबन शाळेला भेट दिली आहे.शाळेची उपस्थिती वाढावी यासाठी शाळेत पावरी कक्ष स्थापन केला,लोकवर्गणीतून वाचनालय उभारले,आदिवासी बांधवांमध्ये व्यसनमुक्ती साठी पुढाकार घेतला आहे.चारबन शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा यश मिळवितात.
चारबन शाळेचा विद्यार्थी बुलडाणा जिल्ह्यातील पहिला पावरा जमातीतील मुलगा एम. बी.बी.एस.ला यंदा प्रवेशित झाला आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु या उपक्रमात चारबन शाळेचा अमरावती विभागातून प्रथम क्रमांक आला होता हे विशेष! असे विविध उपक्रम राबविणारे शिक्षक दीपक उमाळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बुलडाणा जिल्ह्यातील “आयडॉल शिक्षक”म्हणून अमरावती येथे विभागीय चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती तेथे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पुस्तक देऊन उमाळे यांचा गौरव करण्यात आला यावेळी शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके व मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
Add Comment