दुसरबीड | समर्थ भारत मराठी :
महामंडळाची पुणे ते कारंजा बस प्रवाशांच्या चहा व नाश्ता करिता एका हॉटेलवर थांबली होती. या बसमधील लहान मुलांसह प्रवासात असलेल्या चार महिला बस थांबल्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत व संशयास्पद दिसुन आल्याने हॉटेल मालक व नागरिकांच्या सतर्कतेने त्यांना किनगावराजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून लोणार पोलिस स्टेशन हद्दीतही गुन्हे केल्याने यानंतर लोणार पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे किनगावराजा पोलीसांनी सांगितले आहे.
नेहमीप्रमाणे येथील हॉटेलवर एसटी बसेस प्रवाश्यांच्या चहा व नाश्त्याकरिता थांबतात.परंतू देऊळगाव राजा येथुन बसलेल्या चार महिला अचानकपणे गाडीखाली उतरून खाजगी रिक्षाने जाण्यासाठी निघत असल्याचे हॉटेल मालक अमोल भोसले व तेथील प्रवासी नागरिकांनी पाहिले. विशेष म्हणजे या चारही महिलांसोबत ४ वर्षे वयोगटाखालील लहान मुले होती.नागरिकांचा संशय बळावल्याने हॉटेल मालकाने सर्व प्रवाशांना याबाबत सूचना देऊन आपले साहित्य तपासण्यास सांगितले असता त्यामधील एका प्रवासी महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे गंठण गायब असल्याचे समजले. दरम्यान रिक्षाने पोबारा करत असलेल्या चारही महिलांचा पाठलाग करण्यात आला.
दर्गा मस्जिद चौकात रिक्षा थांबवून हॉटेल मालक अमोल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यातील एका महिलेने जवळच्या बॅगमधून सोन्याचे गंठण काढून दिले.या प्रकाराबाबत किनगावराजा पोलीस स्टेशनला माहिती देऊन चारही महिलांना त्यांचे स्वाधीन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील शिवमंदिर येथील रहिवासी असलेल्या शारा व्यंकटेश बोटो वय ३० वर्षे व मुलगी कीर्ती ३ वर्षे, दिवना चिक्कू बोटोरा वय २० वर्षे व मुलगी २ महिने, जिविता पेबस बंतूलेलो वय २५ वर्षे व मुलगी वेनीला वय ३ वर्षे, मयमा व्यंकटेश बोटो वय २४ वर्षे व मुलगा नवीन वय अडीच वर्षे अशी दागिने चोरणाऱ्या महिलांची व लहानग्यांची नावे आहेत.
सदर प्रकाराबाबत किनगावराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे यांनी महिलांना ताब्यात घेऊन भादंवी कलम १०९ अन्वये कारवाई करून सिंदखेडराजा कोर्टामध्ये हजर केले आहे.
Add Comment