देऊळगाव मही,नारायण खेड परिसरातील चित्र:महसूल चे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.
देऊळगाव मही | समर्थ भारत मराठी :
देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही व नारायण खेड परिसरात वाळू माफियांनी खडकपूर्णेच्या पात्रात बेसुमार वाळू उपसा केल्यामुळे नदीची अक्षरशः चाळण होत असून याकडे महसुलचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा होत आहे.
देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व नायब तहसीलदार आसमा मुजावर यांनी वाळू माफियांवर धडाकेबाज कारवाया केल्या.दोन वर्षात कारवाया झाल्या नाही तेवढ्या कारवाया धरण परिसरात केल्या आहेत. आता वाळूमाफीयावर अंकुश बसेल असे चित्र असतांना मात्र तालुक्यातील देऊळगाव मही,नारायण खेड,डीग्रस येथील खडक पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र बेसुमार अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे.नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने पात्राचे नुकसान होत आहे. चोरट्या वाळू वाहतुकीकडे महसूल विभातील काही अधिकारी व तलाठ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दररोज हजारो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू असून यामुळे नदीपात्राची चाळणी होत असून याकडे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
परिसराची लाईफलाईन म्हणून खडकपुर्णा नदीची ओळख आहे.नदीतील पाण्याचा परिसरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी उपयोग होतो. मात्र नदीपात्रातील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने पडलेले पावसाचे पाणी सुध्दा नदीपात्रात साचले नाही.नदीतून जेसीबीच्या साह्याने खड्डे करुन वाळूची चोरी करण्यात येत आहे.दररोज हजारो ब्रास वाळुचा अवैध उपसा करून वाहतूक केल्या जात असल्याने पात्राची चाळण झाली आहे. या प्रकाराकडे महसूल विभागाचे काही कर्मचारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.विशेष म्हणजे पुर्णा नदीत होणारा अवैध वाळू उपसा जालना-चिखली मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.असे असतांना महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे कानाडोळा करीत आहेत.वाळू उपशामुळे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला व पात्रात असणाऱ्या विहीरींना धोका निर्माण झाला आहे. महसूल विभाग ग्रामस्थांनी तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नागरिकांच्या जीवाला धोका
देऊळगाव मही, नारायण खेड सह डीग्रस येथे मोठ्या प्रमाणात वाळु उपसा करण्यात येतो त्यामुळे परिसरातील लोकांचे जीवन धोकादायक ठरू लागले असून रेती उपस्याला तलाठी खतपाणी घालत असून त्या तलाठ्यांवर कारवाई करण्यात यावी व अवैध वाळू उपसा बंद करावा यासाठी अनेकांनी आंदोलने केली मात्र त्याचा काहीच फरक प्रशासनावर पडला नाही उलट जोमात रेती उपसा परिसरात सुरु आहे
Add Comment