श्रेणीवर्धन करण्यास शासनाची मान्यता,आ.डॉ.संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश.
जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.त्यानुसार शासनाने आदेश काढून विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.

आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या जळगाव जामोद ग्रामिण रुग्णालयातचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय करण्यास शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. जळगाव जामोद येथे आता उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने आदिवासी बहुल असलेल्या जळगाव जामोद मतदारसंघाला मोठी आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत.
मतदारसंघाची असलेली रचना पाहता आधी उपलब्ध असलेले उपजिल्हा रुग्णालय जवळपास ५० किमी पेक्षा जास्त असल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या अनुषंगाने शहरातच उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे यासाठी शासन स्तरावर आ.डॉ.संजय कुटे पत्रव्यवहार करीत होते.त्याला आता यश आले असून ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास शासनाने विशेष बाब म्हणून अंतिम मान्यता दिली आहे.
उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याने आता या रुग्णालयाला मोठे महत्व प्राप्त होणार असून यामध्ये तज्ञ डॉक्टर,नर्सेस,अद्ययावत प्रसूतीगृह,अतिदक्षता विभाग, नवजात बालक कक्ष,नेत्र तपासणीकक्ष तसेच नेत्र शस्त्रक्रिया कक्ष,रक्तपेढी,फीजिओ थेरेपी,लसीकरण, बालरोगतज्ञ कक्ष,अतीदक्षता विभाग,मनोरुग्ण विभाग यांसारख्या अनेक सुविधा मिळणार आहेत.
उपजिल्हा रूग्णालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा जवळपास आधीच नियोजन करून निर्माण केले असल्याने श्रेणीवर्धन झालेले रूग्णालय प्रत्यक्षात रुग्णसेवेत यायला जास्त वेळ लागणार नसल्याने लवकरच सर्व गरजू रुग्णांना जळगाव जामोद येथेच आवश्यक उपचार मिळणार आहेत.
Add Comment