■ राजुरी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याच्या गाडीवर धाडसी दरोडा.
■ कामगाराने कारचे जीपीएस लोकेशन दरोडेखोरांना पुरविल्याचे उघड.
■ गुन्ह्यात वापरलेल्या होंडा सिटी कारसह ६ लाखांची रोकड जप्त.
देऊळगाव मही | समर्थ भारत मराठी :
देऊळगाव राजा वरून जालन्याकडे जात असतांना राजुरी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याची गाडी अडवून बेदम मारहाण केल्याचा घटना दि.१४ रोजी घडली.या घटनेनंतर जालना स्थानिक गुन्हा शाखेने तपासाची चक्रे फिरवून ५ दरोडेखोरांच्या मूसक्या आवळल्या आहेत.
जालना येथील लोखंडी सळ्या निर्मितीच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या राजुरी कंपनीचे वसुली अधिकारी रामेश्वर श्रीमाली हे बुलढाणा जिल्ह्यातून वसुली करून दि.१४ ला रात्री जालनाकडे जात होते.दरोडेखोरांनी त्यांची कार देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा घाटामध्ये अडवून त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्याजवळील लाखो रुपयांची रोकड लंपास केली होती.दरोडेखोरांनी त्यांचे व चालकाचे हातपाय बांधून त्या दोघांना शेतात टाकले होते.या प्रकरणात अंढेरा पोलिसांनीअज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला होता.धाडसी दरोड्यामुळे जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.मात्र या प्रकरणात जवळच्याच व्यक्तीचे काम असल्याचा संशय सुरुवातीपासून घोंघावत होता.अखेर जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी याप्रकरणात लक्ष घालून तपास चक्रे फिरवत या दरोड्याचा पर्दाफाश केला आहे.
हा दरोडा टाकण्याची टिप कंपनीतील एका कामगारानेच दिली असल्याचे आणि कंपनी मालकाला माहिती होऊ न देता वसुली अधिकाऱ्यांच्या वाहनांना जीपीएस बसवून लोकेशन व माहिती दरोडेखोरांना पुरविल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलीस निरीक्षक खनाळ यांच्या तपास पथकाने हा दरोडा १५ जणांच्या टोळीने घातला असल्याचा छडा लावला असून त्यापैकी ५ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक होंडासिटी कार, रोख ६ लक्ष रुपये जप्त करण्यात आले. दरोडेखोरांना बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.
Add Comment