देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून वाळू माफीयांनी धुमाकूळ घातला आहे.वाळू माफियांची वाढती दादागिरी पाहता, देऊळगाव राजा तालुक्याचा बिहार होतो की काय?असे वाटत असतांना तहसीलदार वैशाली डोंगरजाळ ह्या महिला अधिकाऱ्यांनी पदभार घेताच आपले इरादे स्पष्ट करून टाकले.तहसीलदार वैशाली डोंगरजाळ व नायब तहसीलदार आसमा मुजावर यांनी ठिकठिकाणी धाडसत्र राबवत वाळूमाफीयांच्या मुस्क्या आवळण्याचा प्रयत्न केला.या धडाकेबाज कारवायांमुळे वाळूमाफीयांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र सध्या तालुक्यात बघायला मिळत आहे.
देउळगावराजा तालुक्यामध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी प्राप्त होणा-या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी,समाधान गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार वैशाली डोंगरजाळ,नायब तहसीलदार आस्मा मुजावर,पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी मेहुणाराजा शिवारामध्ये खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रामध्ये दि.८ रोजी अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी १ बोट, फायबर,सेक्शन पाईप जोडणी केलेले प्रत्येकी १०० फुट जोडणी केलेले एकुण ३ नग. दि.१२,१३ रोजी अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी १ बोट, फायबर, इंजीन,सेक्शन पाईप जोडणी केलेले निदर्शनास आल्यावरुन जप्त केले.सदर यंत्रणेव्दारे अवैध वाळू उत्खनन होत असल्याने व साहीत्य मोक्यावरुन वाहतुक करुन हलवणे शक्य नसल्याने ३ बोटी व फायबर, सेक्शन पाईप,इंजीन व इतर साहीत्य जागेवर नष्ट करण्यात आले.
या कारवाईसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक मागविण्यात आले असून त्यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास पथकाच्या मार्फत कारवाई करण्यात येईल.तसेच जे शेतकरी रेतीचे अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करुन,अवैध रेतीसाठा करण्यास सहाकार्य करतील त्यांच्या ७/१२ वर याबाबतचा बोजा चढविण्यात येणार असून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुक होवु नये यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे.
Add Comment