◆स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणाची कार्यवाही.◆
◆४२ दुचाकीसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त.◆
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
बूलढाणा जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या त्यानुसार अशोक लांडे,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वामध्ये पथक स्थापन करुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कारवाई सुरु होती. या पथकाने धडाकेबाज कारवाई करत ४२ मोटार सायकलीसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून मोटार सायकल चोरीच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे.

यासाठी नियुक्त पथकाने अभिलेखावरील आरोपी तपासले तसेच गोपनिय बातमीदारांना कार्यान्वीत केले. दरम्यान पथकास मिळालेल्या गोपनीय व खात्रीशीर माहितीनुसार दि.१५ रोजी शत्रुघ्न रामचंद्र सोळंके वय २८ वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. जळगाव जामोद ह.मु. रिधोरा ता. मोताळा हा विना कागदपत्राची मोटार सायकल विक्री करीता मोताळा परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलचा अभिलेख पाहीला असता जळगांव जामोद येथील ग्राम वडशिंगी येथून मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.शत्रुघ्न यास पथकाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता मोटार सायकल चोरीच्या रॅकेट मध्ये गंगाराम इकराम पावरा, वय २० रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव, तुळशीराम इकराम पावरा वय २४वर्ष, रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव व सिताराम लेदा मुझाल्दे, वय २४वर्ष, रा. शिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन राज्य मध्यप्रदेश हे देखील मोटार सायकल चोरी व विक्री मध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.मोटार सायकल चोरटे निर्जन स्थळी पार्क केलेल्या मोटार सायकल चोरायचे व त्या कमी पैशात बाहेर राज्यात तसेच बाहेर राज्यामध्ये चोरलेल्या महाराष्ट्रात विक्री करायचे.
आरोपींकडून एकूण ४२ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्यात महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा, जळगांव, नाशिक तसेच मध्यप्रदेशातील मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.चारही आरोपीना तपास दरम्यान अटक करण्यात आली असून तपास पो.स्टे. जळगांव जामोद येथील पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि सागर भास्कर व पोलीस अंमलदार उमेश शेगोकार हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेची ही धडक कार्यवाही सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलडाणा,अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बि. बी. महामुणी, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.अशोक एन लांडे प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा यांच्या नेतृत्वात नंदकिशोर काळे, स.पो.नि निलेश सोळंके, स.पो.नि श्रीकांत जिंदमवार,पोलीस अंमलदार रामविजय राजपूत, दशरथ जूमडे,दिपक लेकुरवाळे,दिगंबर कपाटे,जगदेव टेकाळे, गणेश पाटील,पुरूषोत्तम आघाव,अनंत फरतडे,दिपक वायाळ, मनोज खर्डे,चालक पोकॉ विलास भोसले, सुरेश भिसे, सायबर पो.स्टे. चे राजु आडवे, अमोल तरमळे, संदीप शेळके व योगेश सरोदे यांनी केली.
Add Comment