देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये साखरखेर्डा तालुक्याच्या मागणीसाठी सिंदखेडराजा मतदारसंघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात सरकारचे लक्ष वेधले आहे.

याबाबत बोलतांना आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की,साखरखेर्डा तालुका व्हावा याकरिता १९९२ पासून मागणी आम्ही करत आहोत. १९९५ मध्ये युती सरकार असताना अनेक छोट्या तालुक्यांची निर्मिती झाली त्यावेळेस सुद्धा साखरखेर्डाचे नाव त्या यादीमध्ये होते परंतु काही कारणास्तव होऊ शकला नाही.
१९६५ साली साखरखेर्डा पंचायत समितीचे केंद्र म्हणून सुद्धा निवड झाली होती.त्याचा उद्घाटन सोहळा देखील पार पडला होता परंतु तो नंतर रद्द झाला. सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तहसील व इतर कार्यालयांच्या दृष्टीने लागणारे या ठिकाणी उपलब्ध आहे.
तसेच साखरखेर्डा या गावाला ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत.
साखरखेर्डा व त्यालगतच्या साधारण ९६ गावांना सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, चिखली पंचायत समितीमध्ये वाटण्यात आलेले आहेत. म्हणून या गावातील जनतेला ७० ते ८० किलोमीटर अंतरावर दररोज तहसील व इतर शासकीय कामांसाठी जावे लागते.
साखरखेर्डा हे मोठे गाव आहे आणि ऐतिहासिक भूमी तसेच शैक्षणिक व इतर गोष्टींचा विचार करता यालगतच्या या गावांना जर या नवीन तालुक्यात जोडण्यात आली तर एक चांगला तालुका आपल्याला बघायला मिळेल.
साखरखेर्डा तालुका व्हावा ही जुनी मागणी मान्य करून विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पुनर्रचना समिती गठीत करण्यात आलेली आहे तिला मुदत वाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणूनच या समितीमध्ये साखरखेर्डाचा देखील समावेश करावा अशी मागणी या लक्षवेधीच्या निमित्ताने आमदार डॉ. शिंगणे यांनी केली.
यावर मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी देखील या मागणीवर सकारात्मक उत्तर देत सर्व निकष बघून तसेच मागणीचा विचार करून निर्णय करण्यात येईल असे लक्षवेधी च्या उत्तरात सांगितले.












