Maharashtra Maharashtra crimes बुलढाणा जिल्हा लोणार

लोणारच्या “हत्ता” शिवारात दीड कोटींची गांजाची झाडे केली जप्त. सुमारे १८ तास चालली स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई.

Spread the love

लोणार|समर्थ भारत मराठी :

लोणार तालुक्यातील हत्ता शिवारात स्थानिक गुन्हा शाखेने धडाकेबाज कारवाई करत सुमारे दीड कोटी रुपयांच्या गांजाची झाडे जप्त केली.ही कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेला १८ तासांचा कालावधी लागला.

हत्ता शिवारामधील तीन एकरांत पिकवलेल्या गांजाची ७१० झाडे शोधून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला तब्बल १८ तासांचा अवधी लागला. १२ डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजेपासून सायंकाळी सहापर्यंत झाडांची शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, अंधार पडल्यानंतर जनरेटरचा आधार घेऊन कृत्रिम प्रकाश व्यवस्था करून झाडांचे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. झाडे उपटून जमा करण्यासाठी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्या झाडांचे वजन केले असता तब्बल १४ क्विंटल ७७० ग्रॅमची ही झाडे भरली. त्याची किंमत १ कोटी ४० लाख २७ हजार ७०० रुपये एवढी आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन ही मोठी कारवाई केली. शेत सर्वे क्रमांक १८१ मधील तीन एकर शेतात तुरीच्या आंतरपिकात गांजाची लागवड करण्यात आली होती. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे व पोलीस शिपाई दीपक वायाळ यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तपशीलवार माहिती गोळा करून त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्याकडे अहवाल दिला. १२ डिसेंबरच्या दुपारी साडेबारा वाजता गांजाच्या शेतात कारवाई सुरू करण्यात आली. दुसऱ्या दिवशी १३ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत ही कारवाई चालली.सायंकाळ च्या वेळी अंधार पडल्याने जनरेटर बोलावण्यात आले व लाइटची व्यवस्था करून गांजाच्या झाडांचा शोध घेण्यात आला. १४ क्विंटल वजनाची ही झाडे ट्रॅक्टरमधून पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर काळे, नीलेश सोळंके, सचिन कानडे, पोहेकॉ शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, दिनेश बकले, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, गजानन दराडे, अमोल शेजोळ, वैभव मगर, मनोज खराडे, दीपक वायाळ, वनिता शिंगणे, शिवानंद मुंडे, विलास भोसले, निमिष मेहेत्रे, राजेश शिंगटे, बीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे, अमरनाथ नागरे, राजाभाऊ घोगरे, नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी शंकर खारवाल, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पी.आर. रोकडे, उपनिरीक्षक एन.व्ही. देशमुख, आर.ई. सोनुने, संतोष चव्हाण, गणेश लोढे, विशाल धोंडगे, गजानन सानप, राहुल कायंदे, विठ्ठल चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

दरम्यान, गांजाची शेती करणाऱ्या अनिल धुमा चव्हाण वय ४१ वर्ष या शेतकऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

‘एन्जल’ ने बजावली चोख कामगिरी:पोलिसांना केली मदत.

शेतात शोधलेली झाडे गांजाचीच आहेत याची खात्री पटवण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. अंमली पदार्थांचा तपास करण्यासाठी खास नियुक्त केलेल्या श्वान ‘एन्जल’ला यासाठी पाठविण्यात आले होते. रात्रीच्या वेळी झाडे ओळखण्यात येणारे अडथळे ‘एन्जल’ने हुंगून दूर केले व आपली कामगिरी चोख बजावत पोलिसांना मदत केली.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!