आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती.
जळगांव जामोद,दि.२७(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी) :
जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत तालुक्यातील धरती आबा योजनेत समाविष्ट असलेल्या चालठाणा व पिंपळगाव काळे या गावात महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार डॉ.संजय कुटे व जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य,पुरवठा,सेतू केंद्र, ग्रामपंचायत व पंचायत समिती, महिला व बालकल्याण,शिक्षण,पशुसंवर्धन,समाजकल्याण अशा विविध खात्यांनी सहभाग नोंदवून शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला.यामध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, ई-रेशन कार्ड, कागदपत्रांचा बटवा, विविध प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता.
शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच सेवा पंधरवडा अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे,तहसीलदार पवन पाटील तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
“शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा गरजूंना थेट पोहोचला पाहिजे.समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असून यामुळे सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध होतात.नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.”
…..आ.डॉ.संजय कुटे.
Add Comment