डॉ.अपर्णा कुटे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता.
जळगाव जामोद, दि.३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे रुबल फाऊंडेशनने दोन दिवसीय ‘आदिवासी महिला उद्योजकता विकास कार्यक्रम’ आयोजित करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्त्रीशक्तीचा जागर साजरा केला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.अपर्णा कुटे होत्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत देशाच्या विकासात योगदान देण्याची गरज अधोरेखित केली. महिलांच्या सबलीकरणाला चालना देण्यासाठी रुबल फाऊंडेशनसारख्या संस्थांचे कार्य मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण बाजारपेठेत विक्री योग्य छोटे उद्योग उभारून व्यवसाय वाढवण्याचे आवाहन करत अशा उपक्रमांमुळे आदिवासी महिलांना स्थानिक स्तरावर रोजगारसंधी निर्माण होऊन आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग खुला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला चारबान, उमापूर, वडगाव आदी गावांतील आदिवासी महिला उपस्थित होत्या. प्रशिक्षणादरम्यान महिलांनी स्वतःचे उद्योग आराखडे तयार केले. “या प्रशिक्षणामुळे उद्योजक बनण्याची खरी प्रेरणा मिळाली” असे भावना प्रशिक्षणार्थी सौ.ममिता सस्त्या व सौ. पकाबाई चंगळ यांनी व्यक्त केल्या. “व्यवसायाचे विविध प्रकार, नियोजन व आर्थिक गणिते कशी करावी याची मला पहिल्यांदाच सविस्तर समज झाली” असे मत कु. मंजू जामरा यांनी मांडले.
रुबल फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. कुलदीपसिंह राजपूत यांनी या प्रसंगी सांगितले की, “उद्योजकतेचे प्रशिक्षण घेणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे दारिद्र्याचे दुष्टचक्र तोडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. रुबलच्या माध्यमातून ग्रामीण भारताला बल देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
कार्यक्रमात श्रीमती ज्योती राजपूत, रुबलचा बुलढाणाची चमू शरीफा मासरे, रतन बिबोकार, वहारसिंह बारेला तसेच धानोरा व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Add Comment