Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

शेतीत गांजा लागवडीची व किडणी विकण्याची परवानगी द्या.

Spread the love

खेर्ड्याच्या शेतकऱ्यांची मागणी : तहसीलदारांना निवेदन.

जळगांव जामोद,दि.१(प्रतिनिधी):

सतत तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीत गांजा लागवडीची व किडनी विक्री करण्याची रितसर परवानगी देण्याची मागणी खेर्डा खुर्द आणि खेर्डा बु येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात नमूद आहे की,तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे त्रस्त झालेला आहे.सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता स्वतःची किडनी विकण्या शिवाय किंवा शेतीत गांजा पीक लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.२०२४ चा पिकविमा मंजूर होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होत नाही.

शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन व कापसाचे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अनुदान अजूनही बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही.तर दुसरीकडे यावर्षी मागील दोन महिन्यापासून सततचा पाऊस सुरू असून त्यामुळे कपाशीच्या बोंड्या सडून गळत आहे व सोयाबीनच्या शेतात पावसाचे पाणी थांबल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोकळ राहिलेल्या आहेत.

मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, भुईमुंग,कांदा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून सूध्दा खेर्डा बु व खेर्डा खुर्द या गावातील पंचनामे होवून ही संबंधीत अधिका-यांनी अहवाल निरंक सादर केल्यामुळे मिळणा-या लाभापासून शेतकरी वंचीत राहीले आहेत. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतक-यांनी ईकेवायसी करून सूध्दा अदयाप खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाही.

अश्या विविध समस्यांनी त्रस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी किडण्या विकण्याची व शेतात गांजा लागवड करण्याची रितसर परवानगी मागितली आहे.सोबतच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जदार शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. 

यावेळी अविनाश उमरकर,प्रवीण भोपळे,वासुदेव राजनकर,दिलीप भोपळे, महादेव वानखडे,समाधान गिर्हे,तुळशीराम खिरोडकर,श्रीरंग खिरोडकार, प्रमोद तायडे,देविदास तायडे,आनंदा तायडे, मनोहर म्हसाळ,सुभाष राजनकार,ओमप्रकाश वानखडे, कमला म्हसाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!