जळगाव जामोद,दि.२३(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील चारबन येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दीपक उमाळे यांची राज्य शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ साठी निवड झाली होती. त्यानुसार त्यांना दि. २२ सप्टेंबर सोमवार ला टाटा थिएटर नरिमन, पॉईंट मुंबई येथे एका दिमाखदार शासकीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार ज. मो. अभ्यंकर,मनीषा कायंदे,रंजितसिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग,सचिन्द्र प्रताप सिंह शिक्षण आयुक्त यासह मान्यवरांची उपस्थिती होती.राज्यगीत व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन मान्यवरांच्या हस्ते उमाळे यांना पुरस्कार वितरित करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उमाळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी द्वि भाषा शब्दकोश निर्मिती केली असून आदिवासी क्षेत्रातील मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. चारबन येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असताना त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या भाषिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक पद्धती विकसित केल्या आहेत व लोकवर्गणीतून शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.आदिवासी समाजाच्या चालीरीतींचा त्यांनी अभ्यास करून शिक्षण अधिक सुलभ व आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.या कामगिरीच्या बळावर उमाळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुरस्कार प्राप्त झाल्यावर उमाळे यांनी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली यावेळी भुजबळ यांनी उमाळे यांच्या कार्याचा गुणगौरव करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













