टोल कंपनीला ब्लॅकलिस्ट करा; पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.
संग्रामपूर पत्रकार संघाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
संग्रामपूर,दि.२२(समर्थ भारत मराठी प्रतिनीधी):
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर वाढते हल्ले ही लोकशाहीला थेट गळचेपी करण्याची प्रवृत्ती असून यावर राज्य सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशा प्रखर शब्दांत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून इशारा दिला आहे.
नुकत्याच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे टोल नाक्यावर तीन ते चार पत्रकारांना अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करत पत्रकार संघाने संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील आणि तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडित सोनवणे यांच्यामार्फत सोमवार २२ सप्टेंबर रोजी निवेदन दिले.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित टोल कंपनी ए.एस. मल्टी सर्व्हिसेस यांच्यावर गुन्हा दाखल करून ती कंपनी राज्यभरात ब्लॅकलिस्ट करण्यात यावी. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघाने दिला आहे.
संघाने पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. २०१९ पासून हा कायदा अस्तित्वात येऊनही आतापर्यंत सुमारे ३०० पत्रकारांवर हल्ले झाले; मात्र केवळ ४३ प्रकरणांतच हा कायदा लागू करण्यात आला आहे. सरकारकडून होत असलेल्या कुचराईचा निषेध करण्यात आला असून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने पत्रकार हल्ला प्रकरणांची समीक्षा करण्यासाठी समिती गठीत करावी, तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि जिल्हा पोलिस अधीक्षक सचिव असलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समित्या स्थापन कराव्यात, अशी मागणीही पत्रकार संघाने केली आहे.
निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यासह सचिव विवेक राऊत, ता.उपाध्यक्ष अब्दुल भाई, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, जिल्हा समिती सदस्य श्याम देशमुख, पत्रकार हल्ला कृती समिती सदस्य स्वप्निल देशमुख, तालुका सह सचिव शेख रफिकभाई,दयालसिंग चव्हाण,दीपक चोपडे,विठ्ठल निंबोळकार,अमोल ठाकरे,डिजिटल मीडिया सचिव निलेश तायडे आदी पदाधिकारी पत्रकारांनी स्वाक्षऱ्या करून उपस्थिती दर्शवली.
Add Comment