Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

जिगांव व अरकचेरी प्रकल्पग्रस्तांना ७ कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप.

Spread the love

जळगांव जामोद,दि.२२ | समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :

विदर्भातील सिंचन प्रकल्पाकरीता सन २००६ ते २०१३ दरम्यान ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीनी जमिनी दिल्या  अश्या प्रकल्पग्रस्तांना त्यावेळी कमी मोबदला दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाचे बैठकीमध्ये एकुण १६००० हे. करीता प्रति हे. ५ लक्ष याप्रमाणे रु. ८०० कोटी सानुग्रह मोबदला मंजुर करण्यात आला होता. बुलढाणा जिल्हातील जिगांव सिंचन प्रकल्प व अरकचेरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना आ. डॉ. संजय कुटे यांचे हस्ते रु. ७ कोटी २२ लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप दि.२२ रोजी नगर परिषद सांस्कृतीक सभागृहात करण्यात आले.

जळगांव जामोद मतदारसंघातील निमकराड, मांडवा, पळशी घाट,पिंपळगांव काळे, भुरखेड,सातळी तसेच कुंभारखेड येथील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले. सोबतच संग्रामपुर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांना १ कोटी ८५ लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. जिगांव प्रकल्पातील मानेगांव व आडोळ बु. ता. जळगावं जा. या बाधित गावठाणातील अतिक्रमीत मालमत्तांना सुध्दा २ कोटी २३ लक्ष रुपयाचे वाटप आ. डॉ. संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आले. 

नियामक मंडळाचे मंजुरी नुसार आडोळ खुर्द पुनर्वसीत गावठाणात घर बांधलेल्या प्रकल्पग्रस्तांना पायवा बांधकामाकरीता प्रति कुटुंब १ लक्ष या प्रमाणे अनुदानाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. सदर अनुदान मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नक्कीच पेरणीच्या काळात याची मदत झालेली असुन त्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

बुलढाणा जिल्हातील जिगांव हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असुन हा प्रकल्प पुर्णत्वास जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकरीता शासन सर्वोतोपरी मदत करीत आहे तसेच विशेष बाब म्हणुन सदर अनुदान मंजुर केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेच्या वतीने आभार मानतो.बाधित गावठाणात घरे गेलेल्या प्रकल्पग्रस्त बांधवानी पुनर्वसीत गावठाणात नविन घरे बांधुन स्थलांतरीत व्हावे अश्या सुचना सुध्दा आ डॉ. संजय कुटे यांनी मनोगत व्यक्त करतांना केली

कार्यक्रमाला श्रीराम हजारे, अधीक्षक अभियंता जिगांव प्रकल्प पाटबंधारे मंडळ, शेगांव,परमजीतसिंग जुनेजा कार्यकारी अभियंता, जिगांव धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव, तुषार मेतकर, कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव, कार्यकारी अभियंता, प्रविण चावरे, कार्यकारी अभियंता, जिगांव उपसा सिंचन विभाग, खामगांव तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!