Agriculture News Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद येथे अवैध HTBT कापूस बियाणे विक्री.कृषी विभागाची कारवाई : गुन्हा दाखल.

Spread the love

जळगांव जामोद,दि.१२|समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :

जळगाव जामोद येथे अवैध व अनधिकृत HTBT कापूस बियाणे विक्री करणाऱ्या एका इसमावर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई करत ५९  बियाणे पाकिटे जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, गणेश आप्पासाहेब सावंत, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगाव जामोद येथील आचल नगर येथे एक इसम आपल्या घरात अनाधिकृत HTBT बियाणे विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, जिल्हा निरीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्या मान्यतेने सापळा रचण्यात आला.

दोन पंच, सुनील पवार (तालुका कृषी अधिकारी खामगाव) आणि धनंजय देवकर (लिपिक), तसेच प्रमोद गायके (मोहीम अधिकारी), रमेश जाधव (तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद), आणि कृष्णा भगत (कृषी पर्यवेक्षक) यांच्यासह गणेश सावंत हे आचल नगर, जळगाव जामोद येथे दुपारी ४:०० वाजता पोहोचले. तिथे अशोक रामभाऊ रंदाळे (वय ३९, व्यवसाय सेल्समन, रा. आचल नगर जळगाव जामोद) नावाचा इसम आपल्या घरात अनाधिकृत बियाणे विक्री करताना मिळून आला.याबाबत चौकशी केली असता, अशोक रंदाळे याच्याकडे बियाणे विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्याने हे बियाणे सुनगाव येथील सुखकर्ता कृषी केंद्रातून आणल्याचे सांगितले. त्याच्या घराची झडती घेतली असता RACI 659-5G f1 Hybrid Cotton,Ajeet-5-4G PREMIUM COTTON HYBRID SEEDS,YODHDHA PINK GUARD HYBRID COTTON SEEDS WITH NEW TECHNOLOGY एकूण ५९ पाकिटे जप्त करण्यात आली असून, यापैकी कोणत्याही पाकिटावर उत्पादक, प्रक्रियाकर्ता किंवा विक्रेता यांचा उल्लेख नव्हता. ही पाकिटे शासनाने अनाधिकृत केलेली असून, त्यांच्या विक्रीद्वारे शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती. जप्त केलेल्या पाकिटांमधून प्रत्येकी दोन पाकिटांमधील प्रत्येकी तीन नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले आहेत.

या प्रकरणी अशोक रामभाऊ रंदाळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४), ३३६(४), ३४०(२) अंतर्गत, बियाणे नियम १९६८ च्या कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, ३८ अंतर्गत, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ च्या खंड ३, ९ अंतर्गत, बीज अधिनियम च्या कलम ७(a), ७(c), ७(d) अंतर्गत, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम ७, १५, १६ अंतर्गत, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३, ७, ९ अंतर्गत, आणि वजन व मापे पॅकेज केलेल्या वस्तू नियम १९७७ च्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ कलम १२ (९) आणि कापूस बियाणे किंमत नियंत्रण अधिनियम आदेश २०१५ कलम ५ हे देखील लागू आहेत.

ही कार्यवाही प्रमोद लहाळे (विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती), मनोजकुमार ढगे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा) आणि बाळासाहेब व्यवहारे उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सावधान! अनधिकृत HTBT कपाशीच्या बियाणांपासून फसवणूक टाळा!

सध्या HTBT (Herbicide Tolerant Bt) कपाशीच्या बियाणांबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. तुम्हाला हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, भारतात HTBT कपाशीची लागवड कायदेशीरदृष्ट्या अनधिकृत आहे.याचा अर्थ असा की, जर कोणी तुम्हाला HTBT कपाशीचे बियाणे विकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते बेकायदेशीर आहे आणि त्यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

अनधिकृत HTBT बियाणे वापरण्याचे धोके:

फसवणूक आणि आर्थिक नुकसान: अनधिकृत बियाणे विक्रेते शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेऊन निकृष्ट किंवा भेसळयुक्त बियाणे देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या पैशांचे मोठे नुकसान होईल.

कायदेशीर कारवाई: अनधिकृत बियाण्यांची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊन दंड किंवा इतर शिक्षा होऊ शकते.

उत्पन्नावर परिणाम: अनधिकृत बियाण्यांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नाही, किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो, ज्यामुळे तुमच्या मेहनतीवर आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो.

जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणाचा धोका: अनधिकृत बियाण्यांमुळे जमिनीची सुपीकता धोक्यात येऊ शकते आणि पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

शेतकऱ्यांनी काय करावे?

अधिकृत स्रोतांकडूनच बियाणे खरेदी करा : नेहमी नामांकित आणि सरकारमान्य कंपन्यांकडूनच बियाणे खरेदी करा. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्या.

अनधिकृत बियाण्यांपासून दूर रहा: कोणीही तुम्हाला HTBT कपाशीचे बियाणे विकण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना नकार द्या आणि अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.

माहिती द्या: जर तुम्हाला कोणी अनधिकृत HTBT बियाणे विकताना आढळल्यास, तात्काळ कृषी विभाग किंवा पोलिसांना माहिती द्या.आपल्या शेतीत योग्य आणि कायदेशीर मार्ग अवलंबणे हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. जागरूक रहा आणि अनधिकृत HTBT कपाशीच्या बियाणांपासून होणारी फसवणूक टाळा.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!