जळगांव जामोद,दि.६(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
श्री गणेश मूर्तीचे सुरक्षित विसर्जन करण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांना सुविधा व्हावी व जलप्रदूषणाला आळा बसावा या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने पालिकेत निर्मल्य कलश व कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे.जळगाव जामोद मतदार संघांचे आमदार डॉ संजय कुटे यांनी आपल्या घरी स्थापन केलेल्या गणरायाचे विधिवत पुजा व आरती करीत या कृत्रिम तलावात विसर्जन केले.
नगरपरिषद जळगाव जामोद मार्फत शहरात प्रथमच श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी नगरपरिषदेच्या आवारात घरगुती श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून, दुपारी तीन वाजेपर्यंत १५ ते २० घरगुती श्रींचे विसर्जन झाले आहे व नागरिकांचा या पर्यावरण पूरक उपक्रमास अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.नागरिकांनी श्री गणेश विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी केले आहे.
शहरात नगर परिषदेचे मार्फत मिरवणूक मार्गावर सुव्यवस्था राखण्यासाठी व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्यासाठी दुर्गा चौक,जुना भाजी बाजार व एचडीएफसी बँकेच्या शेजारी अशा तीन ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आले असून तिथे नगरपरिषदेचे प्रत्येकी दहा कर्मचारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मिरवणूक मार्गाचा नकाशा, वैद्यकीय पथकासह उपस्थित ठेवण्यात आले आहे.
नगरपरिषदेमार्फत संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आलेले असून संपूर्ण मार्गावर विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.अग्निशमन दल देखील सज्ज ठेवण्यात आले असून संपूर्ण मिरवणुकीसाठी फिरत्या जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.मुख्य मिरवणूक मार्गाच्या चावडी जवळील एचडीएफसी बँकेच्या शेजारी नगर परिषदेमार्फत मिरवणुकीत सहभागी सर्व पथकांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येत आहे.
Add Comment