शोभायात्रेत ६ हजार भाविकांचा सहभाग : महिला, बाल वारकrऱ्यांचे रिंगण ठरले लक्षवेधी
खामगाव|समर्थ भारत मराठी :
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सुमारे ६ हजार भाविकांनी सहभाग घेतला, तर महिला व बाल वारकऱ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
खामगाव येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने ‘एकच वारी – २ फेब्रुवारी’ ही टॅगलाईन वापरत गेल्या दीड महिन्यांपासून या उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. गावोगावी संवाद बैठका घेत संत तुकोबारायांच्या विचाराचा जागर केला. याला खामगाव व परिसरातील भाविकांनी प्रचंड प्रतिसाद देत या जयंती सोहळ्यात तन, मन आणि धनाने सहभागी झाले. याची फलश्रृती रविवार २ फेब्रुवारी रोजी दिसून आली.
सकाळी नांदुरा मार्गावरील संत तुकाराम महाराज सभागृह येथे राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.आकाशदादा फुंडकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून आरती करण्यात आली. यानंतर ना. फुंडकर यांनी पालखी आणि रथाचे पूजन केले आणि शोभायात्रेला सुरूवात झाली. ही शोभायात्रा जलंब नाका, कोर्ट, टॉवर, शहर पोलिस स्टेशन, अग्रसेन चौक, जगदंबा चौक, फरशी, शहिद भगतसिंह चौक या मार्गाने काढण्यात आली. शोभायात्रेत अग्रभागी श्वेत अश्व, त्यापोठापाठ संत मंडळी, अतिशय तयारीचे गायक, वादक तसेच बाल वारकरी, महिला टाळकरी, संत तुकाराम महाराजांची पालखी, पुरूष टाळकरी, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे अशी वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांचा रथ आणि शेवटी हजारो भाविकांचा समावेश होता. शहरवासीयांच्या वतीने जागोजागी शोभायात्रेचे स्वागत करून जल, शितपेयाचे वाटप भाविकांना करण्यात आले. टॉवर, जगदंबा चौक, फरशी व शहीद भगतसिंह चौक आदी ठिकाणी महिला वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला तर बाल वारकऱ्यांनी पाऊलीतून संत तुकारामांचा रथ तसेच इतर देखावे सादर केले. सुमधूर आवाजातील कीर्तन चाली आणि मृदंगाच्या तालावर सर्वच जण दंग झाले होते. फरशी भागात इंगळे मेडीकल समोर इंगळे परिवार सुटाळपूराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नगर परिषद शाळा क्रमांक ६ येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात येवून भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आला. दरम्यान दुपारी सन्यास आश्रम चांगेफळ येथील महंत स्वामी रामभारतीजी महाराज आणि संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे मा.अध्यक्ष नितिन महाराज मोरे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. कामगारमंत्री ना. आकाशदादा फुंडकर यांनी सहपरिवार तसेच पूर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थित राहत उत्सव समितीचा तसेच भाविकांचा उत्साह वाढविला.
Add Comment