जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
चालू वर्षाचा (२०२३) अग्रीम पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी बांधवांना २५% अग्रीम पीकविमा मिळणार असल्याची माहिती जळगांव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली.
अतिवृष्टी, पावसात खंड, अवकाळी पाउस पडून तसेच पिकांवर येलो मोझॅक विषाणूच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.शेतकरी बांधवांनी विम्याचा हप्ता योग्य पद्धतीने भरलेला होता. महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचे रितसर पंचनामे देखील केलेले आहेत. असे असूनही विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी उशीर केला होता.
पिकावर व शेतकऱ्यांवर आलेले संकट, पिकावरील किडींचा प्रादुर्भाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री पीकविमा योजना २०२३ खरीप पीक विमा योजनेंतर्गत मतदार संघातील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविम्याचा अधिकाधिक याचा लाभ व्हावा याकरिता सातत्याने पाठपुरावा आ.कुटे करत होते.
“कुठलाही शेतकरी अग्रिम विम्यापासून वंचित राहू नये हीच भूमिका आहे. यानुसार सध्या जळगाव जामोद मतदारसंघाला १६ कोटी ७२ लक्ष रुपयांचा अग्रिम पीक विमा वर्ग करण्यात आला असून, येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात अग्रिम विम्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे”
डॉ.संजय कुटे(आमदार, जळगांव जा.)

Add Comment